एडवर्डकडे अजूनही खूप गुपिते आहेत- लॅन स्नोडेन

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून जगभरातील देशांच्या इंटरनेट, ईमेल, फोन यंत्रणेवर ठेवली जात असलेली गुप्त नजर जगासमोर उघड करणार्यास यूएस स्पाय एजन्सीचा कॉन्ट्रॅक्टर एडवर्ड स्नोडेन याच्याकडे अजूनही अशी धक्कादायक अनेक गुपिते आहेत आणि सत्य जगासमोर आणेपर्यंत त्याने रशियातच राहावे असे मत त्याचे वडील लॅन स्नोडेन यांनी पत्रकारांना सांगितले. रशियात एडवर्डची एक आठवडा भेट घेऊन अमेरिकेत परतल्यानंतर जॉन एफ केनेडी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.

स्नोडेन ने रशियात आश्रय घेतल्यानंतर त्याची व त्याच्या वडिलांची प्रथमच भेट झाली आणि भेटीचे हे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले होते. या भेटीत एडवर्डला रशियातच राहण्याचा सल्ला दिल्याचे सांगून लॅन म्हणाले की त्याच्याकडे अजूनही बर्‍याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सत्य जगासमोर आलेच पाहिजे असे आपल्याला वाटते. एडवर्ड रशियात सुरक्षित आहे. तो फरारी झालेला नाही तर त्याने तेथे कायदेशीर आश्रय घेतला आहे. त्याने जे केले त्याची त्याला पूर्ण जाणीव आहे व त्याबद्दल त्याला पश्चाताप होत नाही.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून राबविल्या गेलेल्या या हेरगिरी प्रकरणामुळे जर्मनीपासून ब्राझीलपर्यंत अमेरिकेच्या सर्व मित्र देशांनी तीव्र नाराजी यापूर्वीच  व्यक्त केली आहे. स्नोडेनचे समर्थक त्याच्या कृतीचे वर्णन ह्युमन राईटस चॅपियन असे करत आहेत तर त्याचे विरोधक त्याला देशद्रोही म्हणत आहेत. रशियाने ऑगस्टमध्ये स्नोडेनला कांही अटींवर राजकीय आश्रय दिला आहे.