नवाझ शरीफ भारत पाक क्रिकेट सामन्यासाठी प्रयत्नशील

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान व पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे पॅट्रन इन चीफ म्हणून नेमणूक झालेले नवाझ शरीफ यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भारत पाक क्रिकेट मालिका सुरू व्हाव्यात अशी इच्छा असून त्यासाठी त्यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांना खास प्रयत्न करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.

भारत पाक क्रिकेट मालिका भले तिसर्या  ठिकाणी झाल्या तरी चालतील मात्र त्या पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करा असे शरीफ यांनी नजम सेठी यांना सांगितले आहे. शरीफ हे स्वतः क्रिकेटचे शौकीन आहेतच पण त्यांची ही आवड केवळ सामने पाहण्यापुरती नाही तर १९८० च्या दशकात ते लाहोर जिमखाना टॉप क्रिकेट क्लबकडून काही सामने खेळलेही आहेत. त्यात वेस्ट इंडिजबरोबरच्या सामन्याचाही समावेश आहे. आजही ते इस्लामाबादपासून जवळच असलेल्या त्यांच्या मुरी येथील खासगी हिलस्टेशनच्या निवासस्थानी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात असेही समजते.

मात्र भारत पाक सामन्यांसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांनी नजम सेठी यांच्यावर सोपविल्याप्रकरणी अनेकांच्या भुवया वर चढल्या आहेत. कारण सेठी यांच्यावर पाक क्रिकेट बोर्ड अध्यक्षपदाच्या निवडणुका न घेतल्याचे आरोप असून त्यावरून तेथे वादंग पेटले आहे