दाऊदला प्रवासासाठी मिळतेय पाक मंत्र्याचे हेलिकॉप्टर

मुंबई – अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम याच्यापर्यंत पोहोचण्यात भारत व अमेरिके च्या गुप्तचर यंत्रणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच दाऊदला पाक सरकारचे पूर्ण समर्थन असल्याची बाब उघड झाली आहे. पाकिस्तान मुस्लीम लिगच्या एका मंत्र्याचे खासगी हेलिकॉप्टरच दाऊदच्या तैनातीला देण्यात आले असून याच हेलिकॉप्टरमधून तो स्वात खोर्याातील आपल्या गुप्त तळावर येजा करत आहे असे स्पष्ट झाले आहे.

तालिबानी सक्रीय असलेल्या या स्वात खोर्‍यातच दाऊदने आपला गुप्त अड्डा स्थापला आहे आणि पाकिस्तानात कोणतेही सरकार आले तरी त्याला पाक गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे पूर्ण संरक्षण आहे. सध्याच्या नवाझ शरीफ सरकारलाही दाऊदला पाकिस्तानात कशा सोयी आणि संरक्षण दिले जाते याची पूर्ण माहिती आहे असे गुप्तचर अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दाऊदचे फोन संभाषण रेकॉर्ड केले जाऊ नये यासाठी त्याला स्वतंत्र सुरक्षित लाईनही दिली गेली असल्याचे या अधिकार्‍यांची माहिती आहे.

पाकिस्तानातील अबोटाबाद येथे घुसून अमेरिकन सील कमांडोंनी ओसामाचा खात्मा केल्यापासून त्यापासून धडा घेऊन आयएसआय व अन्य गुप्तचर यंत्रणांनी दाऊदची सुरक्षा वाढविली आहे असे सांगून हे अधिकारी म्हणाले की दाऊद पकडला गेला तर भारतात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमागचे रहस्य उलगडेल अशी भीती आयएसआयला वाटते आहे.