मुंबई – चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेली सोने आयात बंदी व बँकांना सोने विक्री करण्यास घातलेली बंदी फारशी उपयुक्त ठरली नसल्याचे दिसून येत आहे. कांही बँका सरकारने घातलेली बंदी झुगारून ग्राहकांना सोने विकत असल्याचेही उघडकीस आले आहे. यात प्रामुख्याने पाच प्रमुख बँकांचा समावेश आहे. एक्सिस बँक, आयसीआयसीआय, स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा व एचडीएफसी या त्या बँका असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
संबंधित बँकांनी मात्र ते विकत असलेले सोने जुन्या स्टॉकमधील असल्याचे सांगून नवीन आयात केली गेली नसल्याचा खुलासा केला आहे. जे सोने बँकांकडे पडून आहे ते बँका विकू शकतात असा त्यांचा युक्तीवाद आहे मात्र सोने बाजारातील जाणकारांना बँकाचा हा खुलासा मान्य नाही. त्यांच्या मते सोन्यात करावी लागणारी गुंतवणक प्रचंड असते. त्यातच सोन्याचे दर सतत वर खाली चढत असतात. अशा परिस्थितीत दीर्घ काळ सोने साठवण करणे कुणालाच शक्य होत नाही. मग बँकांना तरी ते कसे परवडणार ? जुने सोने विकत असल्याचा बँकांचा दावा संशयास्पद आहे. बँका सध्या विकत असलेले सोने त्यांच्याकडे आले कुठून हाच खरा प्रश्न आहे.