फ्लिपकार्ट संस्थापकांची कोट्यवधी रुपयांची कमाई

बंगळूरु – ई- कॉमर्ससारख्या नव्या संकल्पनेला फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात रुजवणा-या सचिन बन्सल आणि बिनी बन्सल यांनी कोटयवधी रुपयांची कमाई केली आहे. फ्लिपकार्टच्या या दोन्ही संस्थापकांनी सप्टेंबर 2011 ते मार्च 2012 या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी 10.25 कोटींची कमाई केली असल्याचे कंपनी व्यवहार खात्यात सादर केलेल्या विवरणातून उघड झाले आहे.

गेल्या सहा वर्षात फ्लिपकार्टने ई-कॉमर्समध्ये झपाटयाने प्रगती केली. गेल्या वर्षी सिंगापूरमधील एका कंपनीने फ्लिपकार्टवर ताबा मिळवला. मात्र कंपनीने सहा वर्षाच्या काळात बन्सल बंधूना कोटयधीश केले. बन्सल यांना वर्षाला 50 लाखांचे वेतन मिळत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. व्यवसाय योग्य प्रकारे केला तर उद्योगात यशस्वी होता येते, हे यातून सिद्ध झाले असल्याचे फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बन्सल यांनी सांगितले.

चांगल्या सेवेने कंपनीवर गुंतवणूकदारांचाही विश्वास वाढत गेला. ज्यामुळे 2007 पासून कंपनीने गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 3,315 कोटींचा निधी उभारला. केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक केली. यात दक्षिण आफ्रिकेचा प्रसारमाध्यमातील प्रमुख कंपनी नॅसपर, टायगर ग्लोबल, मॉर्गन स्टॅन्ले यांचा समावेश आहे.

गेल्याच आठवडयात कंपनीची भांडवल उभारणीची दुसरी फेरी पूर्ण झाली. यालाही गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे फ्लिपकार्टचे भांडवली मूल्य तब्बल 9,200 कोटींवर गेले आहे. फ्लिपकार्टच्या एकूण हिश्श्यापैकी 25 टक्के हिस्सा हा बन्सल बंधूंकडे आहे. ज्याचे मूल्य 2,250 कोटी आहे. बन्सल यांच्या कमाईने नवा विक्रम स्थापन केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या झुलीले या कंपनीचे सहसंस्थापक डॅरल कॅव्हेन यांनी 1 कोटी 74 लाखांची कमाई केली होती. चालू वर्षात एकूण 6100 कोटींच्या विक्रीचे कंपनीने लक्ष्य ठेवले आहे.