मॅसेच्युएटस – भारताची अर्थव्यवस्था या वर्षअखेर सुधारेल अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली आहे. हावर्ड बिझिनेस स्कूल, केंब्रिज येथे विद्यार्थ्यांसमोर राजन भाषण देत होते. ते म्हणाले रखडलेल्या उद्योग व्यवसायांना मिळालेली परवानगी आणि चांगला मान्सून यामुळे कृषी उत्पादनात होणारी वाढ भारताची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यास मदतगार ठरणार आहेत.
रिझर्व्ह बँक २९ आक्टोबर रोजी पुन्हा एकदा मॉनेटरी पॉलिसीचा आढावा घेणार आहे. त्यात अर्थव्यवस्था बिकट असूनही पुन्हा व्याजदरवाढ केली जाणार का हा खरा प्रश्न आहे असे सांगून राजन म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर मी आत्ता देणार नाही. पर्यावरण आणि कारभारातील अपारदर्शकता यामुळे रखडले गेलेाल्या उद्योगांना पुन्हा उभारणीसाठी मंजुरी दिली गेली आहे. यामुळे ११५ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे हे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्याचा अनुकुल परिणाम या वर्षअखेर दिसू लागेल.
यंदा भारताता मान्सून समाधानकारक आहे. त्यामुळे भारताचा कणा असलेल्या ग्रामीण भागात शेतीबरोबरच पोल्ट्री, पशुपालन यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. महागाई भडकली आहे हे खरे आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढ केल्याने अर्थ जगतातून आश्वर्य व्यक्त केले जात होते. विकसित देशांत व्याजदरवाढीचा प्रतिकूल परिणाम जाणवतो. मात्र ग्रामीण अर्थव्यवस्था हाच मुख्य कणा असलेल्या भारतात त्याचा फारसा परिणाम होत नाही असेही ते यावेळी म्हणाले.