पंढरपूर: अवघ्या वैष्णवांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीतील मंदीर पाडून नव्याने मंदिर का बांधू नये? हा सवाल खुद्द मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी उपस्थित केला आहे. येथील विठलाचे मंदिर एक हजार वर्षे जुने आहे. ते आणखी हजार वर्षे टिकण्यासाठी पुरातत्व खात्याने केलेल्या सूचना या कल्पनेपलिकडच्या असल्याने त्यापेक्षा नव्याने मंदिर बांधण्याचा विचार डांगे यांनी व्यक्त केला आहे.
मंदिर एक हजार वर्षे जुने आहे. ते आणखी हजार वर्षे टिकण्यासाठी पुरातत्व खात्याने केलेल्या सूचना या कल्पने पलिकडच्या असल्याचा दावा डांगे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसात मंदिरातले खांब आणि दगड निसटल्याने काही भाविक जखमी झाले होते. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात मंदिर समिती आणि पुरातत्व विभागातल्या मतभेदांमुळे पेच निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासूनची मंदिराची झालेली दुरवस्था पाहून फक्त डागडुजी करण्याच्या पुरातत्व विभागाच्या भूमिकेला अध्यक्ष अण्णा डांगे यांनी विरोध दर्शवला आहे. डांगे यांच्या मते मंदिराचं मूळ स्वरूप जपण्यासाठी पुरातत्व विभागाने सुचवलेले पर्याय अश्यक्य आहेत. त्यामुळे मंदिराचे आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे मंदिर पूर्णपणे पाडून नव्याने उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.