नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढणार असल्या तरी कॉंग्रेसची भाजपावर आघाडीच असेल असे ऑगस्ट महिन्यात केलेल्या पाहणीमध्ये आढळले होते. परंतु बदलत्या वातावरणात आता मतदारांच्या पाहणीमधून वेगळे चित्र समोर यायला लागले आहे. भारतीय जनता पार्टीला या विधानसभा निवडणुकीत २८ जागा मिळतील आणि कॉंग्रेस पक्ष २२ जागा मिळवून दुसर्या क्रमांकावर राहील, असे एबीपी न्यूज आणि नील्सन् या दोन संस्थांनी केलेल्या ताज्या पाहणीत आढळून आले आहे. या पाहणीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला १८ जागा मिळतील असे दिसून आले आहे.
यापूर्वी करण्यात आलेल्या पाहणीमध्ये आम आदमी पार्टीला अगदी नगण्य जागा मिळतील असे आढळले होते. परंतु आता या पक्षाचा गवगवा वाढत चालला असून एकूण मतदानाच्या १५ टक्के मते या पक्षाला मिळतील, असा निष्कर्ष निघाला आहे. ७० आमदारांच्या या विधानसभेत भारतीय जनता पार्टीला ३४ टक्के मते आणि २८ जागा मिळतील आणि हा पक्ष सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरेल. मात्र त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा या पाहणीचा अंदाज आहे.
कॉंग्रेस पक्षाला भाजपापेक्षा कमी मते आणि २२ जागा मिळतील. असे असले तरीही उत्तम मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. ३२ टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली आहे. कॉंग्रेसच्या शीला दीक्षित आणि भाजपाचे विजय गोयल या दोघांनाही प्रत्येकी २७ टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे. शीला दीक्षित यांची कामगिरी चांगली नसल्याचे १७ ते २३ वयोगटातल्या मतदारांनी आवर्जून नमूद केले आहे. ६५ टक्के मतदारांना शीला दीक्षित नको आहेत.
हे सर्वेक्षण ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले असून त्यासाठी चार हजार मतदारांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. एकदा उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली की या मतांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र दिल्लीमध्ये सत्तांतर होण्याची मोठी शक्यता दिसत आहे.