मुंबई – मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी गायक अदनान सामीला पोलिसांपुढे हजर होण्याची नोटीस बजावली आहे. अदनान सामीने पोलिसांपुढे स्वतःहून हजर व्हावे आणि नंतर देश सोडून जावे, असे या नोटीसीत स्पष्ट करण्यात आले आहे. अदनान सामी त्याच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दाखवून दिले होते. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने पाकिस्तानी गायक अदनान सामीला देश सोडून जाण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे.
मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी गायक अदनान सामीला बजावलेल्या नोटीसीत त्याला एक महिन्यात व्हिसाचं नूतनीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीला सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. व्हिसाची मुदत संपल्यापासून प्रत्येक दिवशी तीस डॉलर प्रमाणे दंड भरण्याचे आदेशही मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
पाकिस्तानी गायक अदनान सामी त्याच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत आहे. त्याच्या व्हिसाची मुदत 6 ऑक्टोबर 2013 रोजी संपली आहे. अदनान सामीने मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्यालयात स्वतःहून हजर होऊन सहकार्याची अपेक्षा केली होती, त्याच्या व्हिसाच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे, तोपर्यंत त्याला भारतात राहू द्यावं अशी विनंती त्याने केल्याचं मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या अमेय खोपकर यांनी सांगितलं मात्र व्हिसा नूतनीकरण झाल्यानंतरच त्याने भारतात यावं आणि त्याच्या व्हिसाची मुदत वाढवू नये, अशी मागणीही मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं केलीय.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अदनान सामीला स्वतःहून पोलिसात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान अदनान सामीने आपण व्हिसा वाढवून घेण्यासाठी अर्ज केला आहे, त्यावर अजून निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे. अदनान सामीने मुंबईतील कुंटूब न्यायालयात एका खटल्या संदर्भात दिलेल्या माहितीत आपल्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट असून आपण अधिकृत व्हिसावर भारतात राहात असल्याचं स्पष्ट केलं होतं.
त्याच्यासाठी भारत सरकारने मंजूर केलेल्या व्हिसाची मुदत 26 सप्टेंबर 2012 ते 6 ऑक्टोबर 2013 अशी होती. अदनान सामी वेळोवेळी त्याच्या व्हिसाचं नूतनीकरण करत आहे. मात्र यापुढे त्याच्या व्हिसाचं नूतनीकरण करू नये अशी मागणीही मनसेने केली आहे.