हे चित्र आणि ते चित्र

गेल्या आठवड्यात देशावर दोन आपत्ती कोसळल्या. एका आपत्तीत म्हणजे वादळात आपत्कालीन व्यवस्थापनाचे आदर्श रूप पहायला मिळाले. अगदी अभिमान वाटावा असे. पण दुसर्‍या आपत्तीत याच यंत्रणेचे अगदी लाज वाटावी असे रूप पहायला मिळाले. जिथे ही यंत्रणा राबवली गेली तिथे व्यापक प्रमाणावर बरबादी अपेक्षित असताना केवळ २० लोकांचे प्राण गेले तर दुसर्‍या आपत्तीत एकाही माणसाचे प्राण जाण्याची गरज नसताना चक्क शंभरावर माणसांना जीवाला मुकावे लागले. आता सरकार कडे पैसाही अधिक यायला लागला आहे. तंत्रज्ञान बदलत आहे. दूरसंदेशाच्या व्यवस्था विकसित होत आहेत. अशा काळात या यंत्रणा अधिक सजग आणि परिणामकारक असायला हव्यात पण त्याऐवजी त्या अधिकाधिक बेपर्वा होत आहेत. आपत्ती व्यवस्थापना साठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला जात आहे हे खरे पण त्या यंत्रणांचा वापर करणारी माणसे जुनाट विचारांची आणि गैरहजर मन:स्थितीची असतील तर त्या साधनांंचा काहीही उपयोग होणार नाही. वादळाच्या आपत्तीत संकट महाभयानक होते. गेल्या शंभर वर्षातले हे सर्वात विनाशकारी वादळ होते. त्यात भयंकर मनुष्यहानी होणार आणि मालमत्तेची हानी तर कधीही विसरता येणार नाही अशी होणार असा इशारा जगभरातल्या तज्ज्ञांनी दिला होता.

असे असूनही या संकटाशी मुकाबला करणार्‍या सार्‍या यंत्रणा अशा काही वेगाने कामाला लागल्या की या वादळांनी हजारो लोकांचे जीव पणाला लागले असताना केवळ २० जण मरण पावले. एरवी भारतात अशा प्रकारच्या आपत्तीत हजारो लोक मारले जाणार हे ठरलेलेच असते. कारण वादळाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यक्षम नसते. सूचना दिली तरी लोक कोणत्याही संकटाचा मुकाबला करताना फार गांभीर्याने करीत नाहीत. अशा वेळी पाळाव्या लागणार्‍या सुरक्षिततेच्या नियमांबाबत भारतीय लोक कमालीचे बेफिकीर असतात. त्यामुळे अशा संकटांत मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होते. अशीच आणि एवढ्याच तीव्रतेची संकटे अमेरिकेत किंवा जपानमध्ये येतात तेव्हा त्यांंचे स्वरूप महाविनाशकारी असते पण तिथे त्यामुळे होणारी प्राणहानी फार अल्प आणि अपवादात्मक असते. आपल्या देशात असे का होत नाही? असा प्रश्‍न आपल्याला नेहमीच पडतो. पण तो संकट येऊन अनेकांना आपल्यापासून हिरावून नेल्यानंतर पडतो. खरे तर असा प्रश्‍न नंतर पडला तरी काही हरकत नाही पण, तेव्हाही आपण त्या प्रश्‍नांच्या अनुरोधाने सावध होत नाही.

१९९९ साली ओरिसाच्या किनार्‍यावर अशाच वादळाने तडाखा दिला होता. यावेळी आलेले पायलीन हे वादळ तेवढ्याच तीव्रतेचे होते. पण ९९ सालच्या वादळात १० हजार लोक मारले गेले होते. यावेळी आपल्या देशातल्या वादळाची पूर्वसूचना देणार्‍या यंत्रणांपासून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणार्‍या यंत्रणांपर्यंत सार्‍या यंत्रणांनी परिणाम कारक काम केल्याने एवढी प्राणहानी टळली. या यंत्रणांना वादळाचा अंदाज तीन दिवस आधीच आला होता. त्यांनी मोठी यंत्रणा राबवून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. लोकांना एवढ्या व्यापक प्रमाणावर हलवण्याचा हा सर्वात मोठा प्रयास होता. तो यशस्वी झाला आहे कारण जिथे शेकडो लोक मरण्याची शक्यता आणि भीती होती तिथे केवळ २० लोक मारले गेले आहेत. या यंत्रणांविषयी आपल्याला अभिमानही वाटला पाहिजे. अमेरिकेत आणि जपानात अशा मोठ्या संकटांत फार कमी लोक मारले जातात असे आपल्याला कळते तेव्हा आपल्या मनात तुलनात्मक विचार येतात आणि अशी स्थिती आपल्या देशात कधी येणार आहे की नाही असा प्रश्‍न आपल्याला पडतो. पण आपणही तसे करू शकतो हे आता या यंत्रणांनी दाखवून दिले आहे. मात्र सारे काही उपलब्ध असतानाही आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा ढिसाळपणाने वागून अनेकांच्या जीवाशी कशा खेळतात हेही याच दोन दिवसांत मध्य प्रदेशातल्या दातिया जिल्ह्यातल्या रतनगढ येथील तीर्थक्षेत्रात पहायला मिळाले.

खरे तर या ठिकाणी अशी चेंगराचेंगरी व्हायलाच नको होती कारण सहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी अशीच चेंगराचंेंगरी झाली होती. त्या प्रकारात फार मोठी जीवितहानी झाली नव्हती हे खरे पण या ठिकाणी अशा अपघाताची शक्यता आहे असे दिसत तरी होते. मग तिथे आधीच सर्व प्रकारची दक्षता घ्यायला हवी होती. आता तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची चेंगराचेंगरी होणे हा प्रकार नित्याचा झाला आहे. हा प्रकार नेमका कसा घडतो याचा अभ्यास करून लोकांना शिस्त लावली पाहिजे. तसे केल्यास या देशातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कधीच असा अपघात होणार नाही. पण घडलेल्या प्रकारावरून कोणीच धडा घेत नाही. येणार्‍या लोकांची संख्या, जागेची उपलब्धता आणि वेळ यांचा हिशेब घालून धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या गर्दीच्या व्यवस्थापनाचा एक पॅटर्नच तयार झाला पाहिजे पण आपण तसा काही प्रकार केलाच नाही. रतनगढला सरकारने त्यांच्या जिम्मेदारीवर तिथे यायला सांगितले होते की काय असा प्रश्‍न पडत होता. पण आपत्ती व्यवस्थापनाची हेळसांड काय भावात पडते हे तरी समजले. आता तरी सावध होऊ या !