दिल्ली – सत्तर जागा असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत भाजपने उभे केलेले कडवे आव्हान लक्षात घेऊन काँग्रेसने गतवेळच्याच सर्व विजयी आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गेल्यावेळी काँग्रेसकडे ४३ जागा होत्या. त्यापैकी चंडिला यांना वगळून बाकी सर्व ४२ जणांना तिकीट दिले जाणार आहे. चंडिला यांच्यावर गुन्हेगारी खटला दाखल झाल्याने त्यांना तिकीट दिले जाणार नाही मात्र नुकतेच पक्षात आलेले मोहम्मद आसिफ व रामसिंह नेताजी यांना तिकीट दिले जाणार आहे.
गतवेळच्याच सर्व उमेदवारांची नांवे काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीकडे पाठविली गेली आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेमलेल्या पक्ष प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची सोमवारी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. उर्वरित २७ जागांसाठी उमेदवार निवडीची जबाबदारी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात आली असून त्यांनी निवडलेली नांवे प्रथम स्क्रिनिंग कमिटीला सादर करावयाची आहेत.
दुसरीकडे भाजपनेही दिल्लीसाठी कंबर कसली आहे. मोदींचा करिश्मा आणि दिल्लीत त्यांच्या सभेला झालेली प्रचंड गर्दी याचा फायदा या निवडणुकांत पुरेपूर उठविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. १७ ते २१ आक्टोबरदरम्यान भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन संफ अभियान राबविणार आहेत.