ओरिसापुढे आता पुराचे संकट

भुवनेश्‍वर – फायलीन वादळाच्या पाठोपाठ आलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे ओरिसामध्ये आता पुराचे संकट ओढवले असून पाच जिल्ह्यातील अनेक सखल भाग पाण्याखाली बुडले आहेत. राज्य सरकारने राज्यातल्या एक कोटी २० लाख लोकांना या जुळ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. पुरामुळे सर्वाधिक बाधित झालेल्या बालासोर जिल्ह्यात अडीच लाख लोक पुराच्या पाण्याच्या विळख्यात अडकले असून त्यांचा जगाशी संपर्क तुटलेला आहे.

वादळामुळे ओरिसाच्या विविध भागात २१ लोक मृत्यूमुखी पडले होते, त्यात आता पुरामुळे मरण पावलेल्या चौघांची भर पडली असून मृतांची संख्या २५ वर गेली आहे. भद्रक आणि मयूरभंज या दोन जिल्ह्यात पुरामुळे या चौघांचा मृत्यू झाला. जयपूर आणि केओझार हे दोन जिल्हेही अतिवृष्टी आणि पुरामुळे त्रस्त झाले आहेत. सुवर्णरेखा, बुधबलंग, वैतरणी आणि जलाका या चार नद्या धोक्याच्या पातळी भरून वहात आहेत.

पुराच्या आणि वादळाच्या संकटामुळे विस्कळीत झालेली रेल्वे आणि सडक वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर यावी यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न जारी आहेत. रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे, परंतु रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत आहेत. काही महत्वाच्या वस्त्या वगळता बहुसंख्य भागामध्ये वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीतच झालेला आहे.