नवी दिल्ली – आंध्र प्रदेश आणि ओदिशा या दोन राज्यांना प्रामुख्याने फटका बसलेल्या फायलीन वादळामुळे पाच राज्यांत मिळून ९० लाख लोकांना फटका बसला आहे. या दोन राज्यांत मोठी प्राणहानी होईल अशी भीती होती. परंतु सुदैवाने ती टळली आहे. अपवाद म्हणून केवळ २३ जण मृत्युमुखी पडले आहेत. मोठी प्राणहानी टाळण्यात यश आले असले तरी मालमत्तेची हानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली असून ती २४०० कोटी रुपयांची असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारताच्या इतिहासामध्ये आजवर कधी केली नसेल एवढी लोकांच्या स्थलांतराची कारवाई मोठ्या कार्यक्षमतेने राबवण्यात आली. सखल भागातील लोकांना पोलीस, लष्कर आणि बचाव दले यांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या पूर्वी अशी संकटे येत असत तेव्हा अशा स्थलांतराची कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणावर केली जात नसे. सरकार फक्त इशारा देत असे आणि लोक स्वतःच्या क्षमतेत होईल तेवढे स्थलांतर करीत असत. ते पूर्णपणे झाले नाही तर अनेक लोक मृत्युमुखी पडत असत.
फायलीन संकटाच्या या प्रसंगी सरकारने पुढाकार घेऊन मोठे स्थलांतर केेले. त्यामुळे लोकांचे जीव वाचले. १९९९ साली अशाच प्रकारचे वादळ आले होते. तेव्हा ओदिशामध्ये १० हजार लोक मेले होते. मात्र यावेळेस ही जीवितहानी टळली. या राज्यात २ लाख ३४ हजार घरे मात्र उद्ध्वस्त झाली. ओदिशाच्या बारा जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला.