मंदी असूनही रोजगारात वाढ

मुंबई – भारताच्या अर्थव्यवस्थेत मंदीची दौड सुरू असतानाही गेल्या तीन महिन्यात रोजगार निर्मितीत ९ टक्के वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात रोजगार वाढणार नाही असे वाटत असतानाच ही वाढ लक्षात आली आहे आणि वाढलेल्या रोजगारामध्ये पाच महानगरांनी ६१ टक्के वाटा उचलला आहे. असोचेम या व्यापारी संघटनेने केलेल्या पाहणीत ही गोष्ट आढळून आली आहे.

या तिमाहीमध्ये त्यापूर्वीच्या तिमाहीपेक्षा १ लाख ३६ हजार एवढ्या जादा नोकर्‍या निर्माण झाल्या आहेत. त्यात बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. या पाच महानगरातसुध्दा दिल्लीचा रोजगार निर्मितीतला वाटा मोठा आहे. दिल्लीमध्ये या तिमाहीत ३२ हजार ३०० नव्या नोकर्‍या निर्माण झाल्या. हे प्रमाण दिल्लीच्या बाबतीत तरी पूर्वीच्या तिमाहीपेक्षा कमी आहे. पण पाच महानगरात सर्वात जास्त आहे.

बंगळुरूमध्ये २१ हजार लोकांना नोकर्‍या मिळाल्या. त्यापूर्वीच्या तिमाहीत ही संख्या १८ हजार ७०० होती. मुंबई आणि कोलकाता या दोन शहरांमध्ये दिल्ली आणि बंगळुरूच्या मानाने कमी नोकर्‍या निर्माण झाल्या. मुंबईत १४ हजार ६००, चेन्नईत ८ हजार ७०० तर कोलकात्यामध्ये केवळ ६ हजार ५०० लोकांना नव्याने नोकर्‍या मिळाल्या.

नोकर्‍या उपलब्ध करून देणार्‍या क्षेत्रामध्ये नेहमीप्रमाणेच माहिती तंत्रज्ञानाची आघाडी आहे. या क्षेत्रात या तिमाहीत ५८ हजार जणांना नोकर्‍या मिळाल्या. एकूण निर्माण झालेल्या नोकर्‍यांमध्ये हे प्रमाण ४२ टक्के आहे आणि त्यात त्यापूर्वीच्या तिमाहीपेक्षा १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकिंग क्षेत्रात २२ हजार नोकर्‍या निर्माण झाल्या असून या क्षेत्राचा दुसरा क्रमांक आहे. त्या खालोखाल बांधकाम क्षेत्राने ७ हजार २०० नोकर्‍या निर्माण करून तिसरा क्रमांक पटकावला आहे.