माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे निधन

पुणे- ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे सोमवारी सकाळी आठ वाजण्याुच्याय सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून धारिया यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. शनिवारी रक्तदाबही कमी झाल्याने त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मोहन धारिया हे महाड तालुक्यातील नाते गावचे होते. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. उच्चशिक्षणासाठी ते पुण्यात आले. कायद्याची पदवी मिळवल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजवादी विचारसरणीचे असलेले धारिया हे सुरुवातीला प्रजा समाजवादी व नंतर काँग्रेस पक्षात दाखल झाले. काँग्रेस पक्षात त्यांची राजकीय कारकिर्द चांगलीच बहरली होती. धारिया १९५७ ते १९६० या कालावधीत पुणे महापालिकेचे सदस्य होते. यानंतर ते लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून खासदार म्हणून बहुमताने निवडून आले.

केंद्रात विविध महत्त्वाच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केल्यावर त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपदही देण्यात आले होते. १९८० साली निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर धारिया राजकारणातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर धारिया यांनी ‘वनराई’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे १५० हून अधिक गावांमध्ये वृक्षारोपण आणि बंधारा बांधून पर्यावरण रक्षणाचे कार्य केले. पुण्यातील प्रश्नांवर सडेतोड मते मांडून धारिया यांनी पुणेकरांच्या हिताला प्राधान्य दिले.

त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय एकता आणि सद्भावनेसाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर देण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर अनेकानी त्यांना आदराजंली वाहिली आहे.