खंडपीठ मागणीसाठी सांगोला येथे वकीलांचा निर्धार मेळावा

सांगोला – कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्मितीच्या मागणीसाठी सांगोला वकील संघाने सोमवार दि.१४ ऑक्टोबर रोजी निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या निर्धार मेळाव्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील वकील उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ/सर्कीट बेंच व्हावे या हेतूने सांगोला येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात सकाळी ११ वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

या मेळाव्यास खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ऍड. शिवाजीराव राणे (कोल्हापूर) तसेच नामवंत वकील श्री. धैर्यशील पाटील (सातारा) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. निर्धार मेळाव्यास सहा जिल्ह्यातील सर्व वकील बंधू उपस्थित राहणार आहेत. मेळावा हा सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मेळावा ठरणार आहे. कारण कोल्हापूर येथे खंडपीठ झाल्यास वरील सहा जिल्ह्यातील पक्षकारांना लवकरात लवकर व कमी खर्चामध्ये न्याय मिळण्यास मदत होणार आहे. खंडपीठाच्या मागणीला सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही तालुक्यातल्या वकील, पक्षकार बंधूचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यामुळे या निर्धार मेळाव्याचे आयोजन सांगोला वकील संघाने केले आहे.

कोल्हापूर सोबत सोलापुरातही अशीच मागणी होत आहे. सोलापूरच्या मागणीला सोलापूरच्याच काही तालुक्यांतील वकिलांचा विरोध आहे. सोलापूर शहर आणि काही तालुक्यातल्या वकिलांंनी गेल्या महिन्यापासून कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. अशा रितीने कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही मागण्यांसाठी सप्टेंबर महिनाभर सहा जिल्ह्यांतले न्यायदानाचे काम पूर्ण बंद आहे. तरीही सरकार काही निर्णय घेत नाही. सांगोल्यातल्या मेळाव्याने सरकारच्या निर्णयाला काही चालना मिळेल काय असा प्रश्‍न विचारला जात आहे.