पाकिस्तानात तालिबानी म्होरक्याला अटक

वॉशिंग्टन – अमेरिकेने पाकिस्तानात सुरू केलेल्या तालिबान विरोधी धरपकड मोहिमेमध्ये तालिबानी संघटनेचा वरिष्ठ नेता लतिफ मेहसूद याला अटक केली आहे. झिन्हूआ या चिनी वृत्तसंस्थेने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा हवाला देऊन ही बातमी प्रसिध्द केली आहे.

तालिबानी संघटनांपैकी तेहरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेचा वरिष्ठ नेता असलेला लतिफ मेहसूद हा नेता आता अमेरिकी सैनिकांच्या ताब्यात आहे. असे आपण निश्‍चितपणे सांगू शकतो असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची प्रवक्ती मेरी हार्फ हिने सांगितल्याचे झिन्हूआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

लतिफ मेहसूद हा तालिबान संघटनेचा सर्वात वरिष्ठ नेता असलेल्या हकिमुल्ला मेहसूद याचा निकटचा सहकारी समजला जातो. त्याच्या अटकेची माहिती देताना प्रवक्त्या मेरी हार्फ यांनी यापेक्षा अधिक माहिती सांगण्यास नकार दिला. २०१० साली न्यूर्यार्कच्या टाइम्स स्न्वेअर या भागात झालेल्या स्फोटाच्या प्रयत्नामागे याच संघटनेचा आणि नेत्याचा हात असावा असा संशय आहे. त्या व्यतिरिक्त या संघटनेच्या काही दहशतवाद्यांनी पाकिस्तानातल्या अमेरिकी वकिलातीतील अधिकार्‍यांवर हल्ले केले आहेत.