उत्तर प्रदेशात १ हजार टन सोने

लखनौ – उत्तर प्रदेशाच्या उन्नाव जिल्ह्यामधील दौंडिया खेडा येथील किल्ल्यामध्ये एक हजार टन सोने पुरून ठेवलेले असल्याचे एका साधूच्या स्वप्नामध्ये आले असून त्याच्या स्वप्नातल्या दृष्टांतावरून आता केंद्र सरकार या किल्ल्याचे काम हाती घेण्यास सज्ज झाले आहे. उत्तर प्रदेशातील एक साधू शोभन सरकार यांना दौंडिया खेडा येथील किेल्ल्यात राजा राव राम बक्ससिंग या संस्थानिकाने एक हजार टन सोने पुरुन ठेवले असल्याचे स्वप्न पडले आणि त्यातून हा सारा प्रकार सुरू झाला आहे.

राजा राव राम बक्ससिंग यांनी शोभन सरकार या साधूच्या स्वप्नात येऊन आपण हे सोने पुरुन ठेवले असल्याचे सांगितले. त्यावर शोभन सरकार यांनी केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांना या स्वप्नाची आणि सोन्याची कल्पना दिली. मात्र बरेच दिवस त्याची कोणी दखल घेतली नव्हती. शोभन सरकार हे फार मोठ्या संख्येने अनुयायी असलेले साधू आहेत. त्यांच्या काही अनुयायांनी काही या संबंधात बरीच पत्रकबाजी केली. सरकारने हे साने उकरून काढावे त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन केले.

या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याने दौंडिया खेडा या गावातील किल्ल्यात उत्खनन सुरू करण्याचे ठरवले आहे. राजा राव राम बक्ससिंग हे या गावाचे संस्थानिक होते आणि १८५७ च्या ब्रिटीश विरोधी बंडामध्ये ते हुतात्मा ठरले होते. त्यांच्या नंतर या लपवलेल्या सोन्याची कुणालाच माहिती नव्हती. आता मात्र ही माहिती व्हायला लागली आहे. परंतु स्वप्नामध्ये येऊन दिलेली अशी माहिती कितपत खरी मानायची असा प्रश्‍न काही लोकांनी विचारला आहे. मात्र तरीही केंद्र सरकार उत्खननाची तयारी करत आहे.