जोधपूर : काळवीटच्या शिकारीप्रकरणी बॉलीवूडमधील अभिनेत्री नीलम, सोनाली बेंद्रे आणि तबू शुक्रवारी जोधपूर कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे. काळवीटच्या शिकारीप्रकरणी सलमान खान आणि सैफअली खानवर जोधपूर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात या अभिनेत्रीची ओळख पटविली जाणार असल्याचे समजते.
‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी १९९८ मध्ये सलमान आणि त्याच्या सोबतच्या कलाकारांनी दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी यावर्षीच्या ६ जुलैपासून खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी मुख्य तक्रारदार असलेल्या पूनम चांद या साक्षीदाराची तसंच तक्रारदाराची उलट तपासणी गुरूवारी सलमान खानच्या वकिलांकडून झाली. शुक्रवारी ही उलट तपासणी सुरू राहणार आहे.
याप्रकरणी आरोपी असलेल्या सर्व सिनेस्टार्सना कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्यातून सवलत मिळाली आहे. तरीही जेव्हा ओळख पटविण्याची आवश्यकता लागेल, तेव्हा आरोपींना कोर्टात हजर केले पाहिजे, असे मुख्य न्यायदंडाधिका-यांनी यापूर्वीच सलमान खानच्या वकिलांना बजावले आहे. सलमान खान आणि सैफ अली खान हे नेहमी टीव्ही सिनेमात दिसणारे चर्चित चेहरे असल्यामुळे त्यांच्या ओळख परेडची आवश्यकता नसल्याचे सलमान खानचे स्थानिक वकील हस्तीमल सारस्वत यांनी सांगितले. मात्र अभिनेत्रीबाबत अजून स्पष्ट आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे अभिनेत्रींना आज कोर्टात प्रत्यक्ष हजर राहून ओळख परेडचा सामना करावा लागणार असे दिसते.