अमिताभ बच्चनचा आज ७१ वा वाढदिवस

मुंबई- अभिनय, स्टाईल आणि विनम्रता या गुणांच्या जोरावर लाखो रसिकांची मने जिंकणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा शुक्रवारी ७१ वा वाढदिवस आहे. ‘सात हिंदुस्तानी’ या सिनेमापासून सुरू झालेला प्रवास ‘कौन बनेगा करोडपती’पर्यंतच्या प्रवासात अमिताभ यांनी यशाच्या सर्वोच्च धुंदीपासून ते सर्वसामान्य माणसासारखा कर्जाच्या संकटाचा अनुभव घेतला आहे. त्या मुळेच त्यांसची ही चार दशकांची कारकीर्द यशस्वीस मार्गक्रमण करीत आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काही विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणाले, ‘मी लोकप्रियतेचा कधीही विचार करत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ-उताराचे टप्पे येतात. जे उंचावर जाते ते खाली येते. मी यापेक्षा वेगळा आहे असे मला वाटत नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात चढ-उतार येतात. तुम्ही या सर्वाकडे कसे पाहता, कसे सामोरे जात यावर सर्व काही अवलंबून असते. जर तुमच्याकडे यश आहे तर ते, फार कमी काळासाठी आहे हे लक्षात घ्या. आणि यश नसेल तर ते मिळवण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन प्रयत्न करा.’

चार दशकाच्या कारर्किदीत अमिताभ यांनी १८० हून अधिक सिनेमात भूमिका केल्या आहेत. सहकलाकारांविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘प्रत्येकाने त्याच्या क्षमतेमध्ये चांगले काम केले आहे. मी माझ्या लोकप्रियतेचा विचार करत नाही. शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, धर्मेंद्र या आपल्या एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल अमिताभ म्हणतात. आजही माझे सहकलाकार चित्रपटसृष्टीत ब-यापैकी सक्रीय आहेत. विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकरणात चांगले यश कमावले आहे.’

दिलीप कुमार आणि वहिदा रेहमान हे माझे सर्वकालिक आवडते अभिनेते असून, ते आजही आपले आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. १९८२ मध्ये एकदाच शक्ती चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप कुमार यांच्यासह काम करण्याची इच्छा पूर्ण झाल्याची आठवण अमिताभ यांनी सांगितली.