हैदराबाद – आंध्र प्रदेशाच्या विभाजनाच्या निषेधार्थ हैदराबाद येथे आमरण उपोषणास बसलेले वाय.एस.आर. कॉंग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपोषणाचा कालचा पाचवा दिवस होता. हैदराबाद येथील उस्मानिया जनरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी काल त्यांची तपासणी केली आणि त्यांची शर्करा खालावली असल्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे असे आवाहन त्यांना केले.
जगन मोहन रेड्डी यांच्या रक्तातील किटोनचे प्रमाणही कमी झालेले आहे, असेही त्यांच्य तपासणीत निष्पन्न झाले. मात्र त्यांनी डॉक्टरांचा सल्ला जुमानला नाही. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने उचलून निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस्च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जगन मोहन रेड्डी यांना ज्या मार्गावरून रुग्णालयात नेण्यात आले त्या मार्गावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना द्रव अन्न भरवण्यात आले. त्यांच्या मातोश्री वाय.एस. विजयम्मा या रुग्णालयात आल्या. त्यांच्या सोबत त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते कोणाथाला रामकृष्ण हेही होते. त्यांनी तेलंगणाच्या संदर्भात केंद्र सरकार हुकूमशाही प्रवृत्तीने वागत असल्याचा आरोप केला.