राज्य सरकारी कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढला

मुंबई- राज्य सरकारी कर्मचा-यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता सरकारी कर्मचा-यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचा-यांच्या भत्यातही वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ८०० कोटींचा बोजा पडणार आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या चाकरमान्यांची दसरा-दिवाळी सण उत्साहात साजरा होणार असे दिसते.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कर्मचा-यांच्या महागाई भत्त़-यात वाढ केली होती. त्यानुसार राज्यी सरकारच्या कर्मचा-यांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळेच राज्य सरकारने कर्मचा-यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता सरकारी कर्मचा-यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.

दरम्यान, केंद्राच्या पार्श्वभूमीवर वेतनभत्ते मिळावे यासाठी बुधवारी करण्यात येणा-या `दोन तास काम बंद` आंदोलनावर कर्मचारी संघ ठाम आहेत, असे राजपत्रित अधिकारी संघाचे ग. दि. कुलथे यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळी १० ते १२ या कालावधीत मंत्रालयासह राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी काम बंद ठेवणार आहेत.