जहीर खान, सेहवागला पुन्हा संधी

हुबळी – खराब कामगिरीमुळे अडचणीत आलेले वीरेंद्र सेहवाग, जहीर खान या दिग्गज खेळाडूना पुन्हा- एकदा भारत अ संघात स्थान दिले आहे. भारत अ संघ आणि वेस्ट इंडीज अ संघ यांच्यातील तिस-या चारदिवसीय सामन्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. भारताकडून वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, जहीर खान आणि चेतेश्वर पुजारा खेळणार असल्याचे समजते.

वेस्ट इंडीजने सुरुवातीचा सामना जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दुसरा चार दिवसीय सामना ड्रॉ झाला. मालिका गमावण्याची नामुष्की टाळण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि जहीर खानला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

शिमोगा येथील दुस-या सामन्यात सेहवाग आणि गौतम गंभीर अपयशी ठरले होते. यामध्ये गंभीरने ११ आणि सेहवागने सात धावांची खेळी करून सर्वांची निराशा केली होती. सेहवागला ३० कसोटी डावांत एकही शतक झळकवता आले नाही. दुसरीकडे जानेवारी २०१० पासून गंभीरला ४० कसोटी डावांत धावांचा तिहेरी आकडा पार करता आला नाही. एका वर्षानंतर पहिला सामना खेळणा-या वेगवान गोलंदाज जहीर खानला दुस-या सामन्यात ९३ धावा देऊन दोन विकेट घेता आल्या. जहीर ऑक्टोबर २०१० नंतर कोणत्याही कसोटी डावात पाच विकेट घेऊ शकला नाही.

सेहवाग आणि गंभीरशिवाय पुजाराला सामन्यात जगदीश, अभिषेक नायर आणि उदय कौलकडून मोठ्या खेळीची आशा आहे. या तिघांनी गत सामन्यात अर्धशतकी खेळी करून पाहुण्या विंडीज संघाचे विजयाचे मनसुबे उधळून लावले. या सामन्यात चांगली कामगिरी करून टीम इंडियासाठी मार्ग मोकळा करण्याची ही तिघांसाठी संधी आहे.