तिसर्‍या आघाडीची गांभीर्याने बोलणी

नवी दिल्ली – डावी आघाडी आणि काही प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी आकाराला येत असून त्या दृष्टीने गंभीरपणे चर्चा सुरू आहे, अशी माहिती डाव्या आघाडीच्या प्रवक्त्याने दिली. अशा प्रकारची भाजपा आणि कॉंग्रेसला सोडून असलेली तिसरी आघाडी निवडणुकीच्या पूर्वी आकाराला येऊ शकली नाही तरी निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.

निवडणुकीच्या आधी आघाडी करून निवडणुका लढवण्यामध्ये आणि जागा वाटपामध्ये अनेक अडचणी येणार आहेत आणि त्यांची जाणीव या नेत्यांना झालेली आहे. परंतु या उपरही काही तडजोडी करून एकत्रित निवडणुका लढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, मात्र त्यातही यश आले नाही तरी सर्व पक्ष आपापल्या मर्जीने निवडणुका लढवतील आणि निवडणुकांच्या नंतर जे राजकीय चित्र निर्माण होईल त्यात भाजपा आणि कॉंग्रेसला वगळून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या प्रवक्त्याने सांगितले.

१९९६ साली देशात निर्माण झालेल्या परिस्थिती प्रमाणेच याही वेळी झाली तर तिसरी आघाडी सत्तेवर येऊ शकते, अशी आशा या प्रवक्त्याने व्यक्त केली. अशा संभाव्य आघाडीमध्ये जनता दल (यू), समाजवादी पार्टी हे दोन पक्ष आघाडीवर असतील आणि नंतर त्यामध्ये बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस हे पक्ष सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली.