२०१४ नंतर मोठे राजकीय परिवर्तन

मिर्झापूर – भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पक्षाचे उत्तर प्रदेशातील प्रभारी अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात मिर्झापूर येथे बोलताना, २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात मोठे राजकीय परिवर्तन होईल असा विश्‍वास व्यक्त केला. नरेंद्र मोदी हे देशातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत आणि त्या लोकप्रियतेचा फायदा होऊन भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेवर येईल, अशी खात्री त्यांनी दिली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणीही कल्पिले नसेल असे हे मोठे राजकीय परिवर्तन असेल असे श्री. अमित शहा म्हणाले. मिर्झापूर येथील विंध्यवासी देवीच्या मंदिराची पूजा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाची प्रचंड लाट निर्माण झालेली आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकानंतर सत्तेवर येणार्‍या सरकारचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करणार आहेत, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशाच्या भाजपाच्या शाखेमध्ये काही संघटनात्मक त्रुटी होत्या. त्या दूर करण्यात आल्या असून त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हा राज्यातला सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरणार आहे, असा दावाही त्यांनी केला. पक्षाचे उमेदवार नंतर जाहीर केले जातील, त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे असेही ते म्हणाले.