हिमालयाच्या कुशीत मोठ्या भूकंपाची शक्यता

नवी दिल्ली – हिमालय पर्वतराजीमध्ये जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतच्या भूभागात ८ रिश्‍चर स्केलचा भूकंप होण्याची शक्यता असून तसा तो झाल्यास ८ लाख लोक मृत्यूमुखी पडू शकतील, अशी भीती राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष एम. शशीधर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.

पूर्ण हिमालयाचा पट्टा हा भूकंपाच्या दृष्टीने अतीशय सक्रिय आहे. १८९७ ते १९५० या केवळ ५३ वर्षांच्या अल्प कालावधीत या पट्ट्यात चार मोठे भूकंप झालेले आहेत. तसे भूकंपाचे छोटे-मोठे धक्के बरेच बसले आहेत, पण हे चार धक्के ८ रिश्‍चर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचे होते. शिलॉंग (१८९७), कांग्रा (१९०५), बिहार-नेपाळ सीमा (१९३४) आणि आसाम (१९५०) असे ते चार भूकंप होते आणि त्या चारही भूकंपात प्रचंड हानी झालेली होती.

१९५० नंतर या परिसरात एवढा मोठा भूकंप नंतर कधी झाला नाही. त्यामुळे तो आता कधीही होऊ शकतो असे डॉ. शशीधर रेड्डी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या भूकंपातून होऊ शकणारी जीवित आणि मालमत्तेची हानी टाळायची असेल तर भूकंपनिरोधक बांधकामे आणि लोकांना प्रशिक्षण या दोन गोष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.