कानपूर – नरेंद्र मोदी यांची कानपूर येथील १९ ऑक्टोबरला नियोजित असलेली जाहीर सभा होऊ नये यासाठी समाजवादी पार्टी तर्फे प्रयत्न केले जात असले तरी ही सभा होणारच असा निर्धार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून त्या संबंधीची परवानगी आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. आधी ही सभा १५ ऑक्टोबरला होणार होती, परंतु ती २० ऑक्टोबरला होईल असे जाहीर करण्यात आले. या दोन्ही दिवशी कानपूरमध्ये धार्मिक महोत्सव असल्यामुळे या दोन्ही तारखा रद्द करून १९ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली.
नरेंद्र मोदी यांची ही सभा मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी प्रयत्न जारी आहेच, मात्र त्यासाठी कानपूरमध्ये तेवढे मोठे मैदान उपलब्ध नाही. रेल्वेचे मैदान केवळ पुरेसे ठरू शकेल असे वाटल्यावरून रेल्वेशी संपर्क साधला, परंतु रेल्वेने मैदान देण्यास नकार दिला. अशा प्रकारे मैदान उपलब्ध होण्याच्या बाबतीत अडचणी यायला लागल्या. भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी प्रयत्न करून अन्य मैदान मिळवले आहे आणि सभा होणारच असे जाहीर केले आहे.
कानपूर प्रभागातील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीला विजयाची खात्री वाटत आहे. कोळसा मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल हे कानपूरमधून निवडून आले आहेत, परंतु यावेळी त्यांचा पराभव करू असा आत्मविश्वास भाजपा नेते व्यक्त करत आहेत. तथापी भाजपाने आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही.