सलमान खानला ‘दबंग’खान बनवणारा दिग्दर्शक म्हणजे अभिनव सिंह कश्यप. त्याने अपल्या दुसर्या चित्रपटासाठी रणबीर कपूरची निवड केली, जोडीला त्याच्या मम्मी – पपानांही घेतले. कपूर फॅमिलीचा अभिनय चांगला असला, तरी कथेमध्ये दम नाही आणि सादरीकरणात नाविन्याचा भाव असल्याने ‘बेशरम’ कंटाळवाणा झाला आहे.
चित्रपटाची संपूर्ण कथा अनाथ असणार्या बबली (रणबीर कपूर) भोवती फिरते. बबली कार मेकॅनिक असतो. प्रत्यक्षात मात्र तो कार चोरणारा चोर आहे. मात्र, आपल्या चोरीतील काही पैसे तो आपल्या अनाथाश्रमात दान करत असतो. दिल्लीतील एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करणारी तारा शर्मा (पल्लवी शारदा) आपल्या मैत्रिणींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मैत्रिणीच्या लग्नात नवी कोरी मर्सिडिज एमयूव्ही कार घेऊन येते, या लग्नातच बबली आणि ताराची भेट होते.
बॉलिवूडच्या नियमाप्रमाणे बबली ताराच्या प्रेमात पडतो. ताराला प्रपोज करण्यासाठी अखेर तो तिच्या ऑफिसमध्ये जातो तिथून अपमानीत होउन त्याला बाहेर यावे लागते. प्रेमात नकार मिळालेला बबली तिच्या ऑफिस बाहेरून मर्सिडीज चोरतो, मात्र ती कार ताराची आहे असे कळल्यानंतर आपल्या प्रेयसीची कार परत मिळवून देण्याची प्रतिज्ञा बबली करतो.
त्यासाठी एकच अट ताराला घालतो. जिथे त्याने कार विकली असते, तिथे चंडिगढमध्ये ताराने बबलीसोबत यायचे. चंडिगढच्या प्रवासात फारसं काही घडत नाही. बबलीने विकलेली कार आता हवाला किंग चंडेलच्या (जावेद जाफ री) ताब्यात आहे. तो तेथूनही कार चोरतो आणि मग नायक – खलनायकाचा पाठलागाचा खेळ सुरू होतो.
चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी जबरदस्त असली तरी ट्रेलरवरून हा चित्रपट फार काही वेगळा आहे असे नाही याची कल्पना आपल्याला आलेली आहेच. तरीही ‘दबंग’ नंतर अभिनवचा दुसरा चित्रपट असल्याने थोडी उत्सुकता होती. मात्र, दमदार कथानकाअभावी अभिनव आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. या चित्रपटात थोडासा ‘दबंग’, थोडासा अजब प्रेम की गजब कहानी’, थोडं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा अनेक चित्रपटांचे मिश्रण आपल्याला पाहायला मिळते यामुळे प्रेक्षकांना हवे असलेले नावीन्य देण्यात दिग्दर्शक अपयशी ठरल्याचे दिसते.
ऋषी कपूर आणि नितू सिंग बेशरम’ चित्रपटाचा प्राण आहेत. शेवटच्या अर्ध्या तासात या दोन मुरलेल्या कलावंतांनी आपल्या जादूने मुलगा रणबीर कपूरच्या चित्रपटाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांमध्ये संघर्षाचे एक दृश्य आहे, ज्यात अनाथ मुलांचा जीव वाचवण्यासाठी ते अफाट पैशाला लाथ मारतात. या दृश्यानंतर दोघांनी क्लायमॅक्सदेखील सावरला. यापूर्वी पत्नीने जिद्द केल्याने लाच घेणार्या इन्स्पेक्टर चुलबुल चौटालाच्या मनात नैतिकतेविषयीचे द्वंद्व सुरू होते. मनातील हा संघर्ष ऋषी कपूरने एका अनुभवी कलाकाराप्रमाणे व्यक्त केला. त्यांच्या आणि नितूच्या प्रेमाचे रसायन युवा नायक-नायिकेपेक्षा जास्त चांगले आहे.
रणबीर कपूरच्या प्रतिभेचा वापर चित्रपटात होऊ शकला नाही. कारण दिग्दर्शकाने त्याचे पात्र मुळातच कमकुवत मांडले आहे. त्यातल्या त्यात भावहीन नायिका सोबत असली तर रिअॅक्शनच्या कमतरतेत सगळ्या अॅक्शनची वाट लागते. कोणताही दिग्दर्शक एका मजेदार चुलबुलच्या आधारे पूर्ण आयुष्य काढू शकत नाही. रणबीरचा निरागसपणा झाकला जाऊ शकणार नाही. ‘बेशरम’ होण्यात त्याने भरपूर मेहनत घेतली आहे. मात्र ते स्वाभाविक होऊ शकले नाही. चित्रपटात भरपूर गाणी आहेत मात्र एकही लक्षात राहत नाही. एकंदरीत काय तर नाविन्याचा अभाव असलेला रणबीरचा ‘बेशरमपणा रजत पडद्यावर पाहायला हवाच असा नाही,
चित्रपट – बेशरम
निर्माता – संजीव गुप्ता, हिमांशू किशन मेहरा
दिग्दर्शक – अभिनव सिंह कश्यप
संगीत – ललित पंडित
कलाकार – रणबीर कपूर, ऋषी कपूर, नितू सिंग, पल्लवी शारदा, जावेद जाफरी
रेटिंग – * *
—