गँगरेप प्रकरणी आठ जणांना पोलिस कोठडी

धुळे: धुळे न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणा-या आठही नराधमांना, १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या नराधमांनी पीडित मुलीवर धुळे शहराजवळील डेडरगाव तलाव परिसराजवळ सामूहिक बलात्कार केला होता.

या गुन्ह्यातील सूत्रधार नानू ऊर्फ उमेश विष्णू कानगुडे आहे. त्याने पीडित १६ वर्षीय मैत्रिणीच्या घरच्यांना विश्वासात घेऊन, तिला तिच्या नातेवाईकांकडे एका धार्मिक कार्यक्रमाला घेऊन जातोय, असं सांगितलं होतं. त्यानंतर तो तिला घेऊन टू व्हिलरवरून शहराजवळ असलेल्या डेडरगाव तलाव परिसरातील एका पुलाखाली आला. तिथे अगोदरपासूनच राहुल भास्कर गावडे , महेश शिवदास गावडे , राजू दगडू गावडे , संतोष रोहिदास बोरसे ,एकनाथ रामदास पवार, चंदर एकनाथ मोरे आणि धर्मा एकनाथ आहिरे हे थांबले होते. या आठही जणांनी तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर एकनाथ रामदास पवार, चंदर एकनाथ मोरे ,धर्मा भगवान आहिरे या चार आरोपींनी या अत्याचाराचे मोबाईल चित्रीकरण केले. तसेच पीडित मुलीला समाजात बदनामी करण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणातील राजू दगडू गावडे ,महेश शिवदास गावडे या दोन आरोपींना मनमाड येथे अटक करण्यात आली. धुळे न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणा-या आठही नराधमांना, १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.