उस्मानाबाद- तुळजाभवानी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भविकाचा मृत्यू झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेदिवशी शनिवारी पहाटे मंदिर परिसरात चेंगराचेगरी झाली. यामध्ये सुमारे १९ जण जखमी झाले आहेत. यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये हरिदास दिनू कपाळे (६०) यांचा मृत्यू झाला. कपाळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून देवीच्या दर्शनासाठी आले होते.शनिवारी नवरात्रोत्सवाचा पहिलाच दिवस असल्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर भक्तांची गर्दी उसळली. प्रचंड गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी थोड्यावेळासाठी मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला.
प्रवेशद़वार बंद केल्या्ने यावेळी काही भाविकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गर्दी हाताळणे कठीण होत असल्याचे पाहून राजे शहाजी महाद्वार परिसरात पोलिसांनी लाठीमार केला. अचानक करण्यात आलेल्या लाठीमारामुळे यावेळी नागरिकांची पळापळी झाली. यावेळी झालेल्या धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीत हरिदास कपाळे यांचा मृत्यू झाला. यामध्ये सुमारे १९ जण जखमी झाले आहेत. यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.