नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि मिझोरममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर नक्षलग्रस्त छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
डिसेंबरमध्ये विधानसभांचा कार्यकाल संपत असलेल्या दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोरम या राज्यांपैकी सर्वात आधी मतदान छत्तीसगढमध्ये होणार आहे. छत्तीसगढमध्ये 11 आणि 19 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मध्यप्रदेशनंतर राजस्थानमध्ये 1 डिसेंबर रोजी मतदान पार पडेल सर्वात शेवटी मतदान दिल्ली आणि मिझोरम या तुलनेनं छोट्या राज्यात होणार आहे. दिल्ली आणि मिझोरमसाठी निवडणूक आयोगाने 4 डिसेंबर ही मतदानाची तारीख निश्चित केली आहे. निवडणूक आयोगाने मतदान कार्यक्रम जाहीर केलेल्या सर्व पाच राज्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुढील वर्षी होणा-या लोकसभा निडवणुकीची सेमी फायनलफ मानल्या जाणा-या पाच राज्यातील निवडणूकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व राज्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. या पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल आठ डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना प्रथम उमेदवार नाकारण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70, मध्य प्रदेश विधानसभेच्या 230, राजस्थान विधानसभेच्या 200, छत्तीसगड विधानसभेच्या 90 तर मिझोराम विधानसभेच्या 40 जागांसाठी निवडणूका होत आहेत. या पाच राज्यातील 630 विधानसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी 11 कोटी मतदार मतदान करतील. मध्य प्रदेश विधानसभेची मुदत 12 डिसेंबर रोजी, मिझोराम विधानसभेची मुदत 15 डिसेंबर रोजी, दिल्ली विधानसभेची मुदत 31 डिसेंबर रोजी तर छत्तीसगड विधानसभेची मुदत चार जानेवारी 2014 रोजी संपत आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असल्याचे संपत यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यासाठी 11 तर दुस-या टप्प्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
विधानसभेच्या 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशमध्ये 25 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर राजस्थानमध्ये 200 जागांसाठी एक डिसेंबर रोजी मतदान पार पडेल. दिल्ली आणि मिझोराममध्ये चार डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत तर मिझोरामध्ये 40 जागांसाठी मतदान होणार आहे. गुजरातमधील सुरत आणि तामिळनाडूमधील यरकौड विधानसभसाठीची पोटनिवडणूक चार डिसेंबर रोजी होणार आहे. 2008 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्ली, मध्य प्रदेश राजस्थान, मिझोराम या राज्यात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. तर छत्तीसगड दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. या पाच राज्यातील निवडणूकां शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल 60 हजार सुरक्षा जवानांची गरज लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.