बॉलीवूडच्या कलाकारांमध्ये सरोगेट बेबीचे आकर्षण जरा जास्तच वाढले असल्याचे दिसत आहे. सुरुवातीस आमिर खान आणि त्यानंतर शाहरूख खान यांनी असे बाळ स्वीकारले. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी एक सिलेब्रिटी जोडपे या मार्गावर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अरबाज खान आणि मलाइका अरोरा खान यांनाही सरोगेट बेबी हवी असून त्या दिशेने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी मल्लिका दक्षिण मुंबईतील एका क्लिनिकमध्ये गेल्याचे अनेकांनी पाहिले होते.
सरोगेट बेबी जन्मास घालण्याची इच्छा असलेली दाम्पत्ये बर्याचदा या क्लिनिकमध्ये जात असतात. ३९ वर्षीय मलाइका आणि अरबाज यांच्या लग्नाला दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. या दोघांना अरहान नावाचा एक मुलगा असून आता तोही दहा वर्षांचा झाला आहे. अरहानच्या जन्मानंतर मलाइकाने काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर दमदार पदार्पण करत तिने धमाकेदार आयटम नंबर केले, ते सगळेच सुपरहिट ठरले.
अरहान आता बराच मोठा झाल्याने आपल्या आयुष्यात आणखी एखादे मूल असावे, असे मलाइका आणि अरबाज यांना वाटू लागले आहे. मात्र आपले वय आणि समोर असलेली कारकीर्द पाहता मलाइका स्वत: मूल जन्मास घालण्यास इच्छुक नाही. म्हणून त्यातून मध्यम मार्ग शोधत तिने सरोगेट बेबी स्वीकारण्याचा पर्याय निवडला आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान व किरण राव यांनाही अशाच प्रकारे मूल झाले होते. प्रचंड वादग्रस्त ठरलेली शाहरूखची सरोगेट बेबी तर सगळ्य़ांनाच आठवत असेल. अबराम नावाचा पाहुणा शाहरूखच्या घरात सरोगेट मदरच्या मदतीने आला होता.