पाकिस्तानची खोड मेल्याविना जाणार नाही

पाकिस्तान हा देश लष्करीदृष्ट्या भारतापेक्षा कमकुवत असला तरी भारत देश आक्रमक नाही हा भारताचा कमकुवतपणा आहे. आपण कितीही खोड्या काढल्या तरी भारतीय सैन्य आपल्यावर आक्रमण करत नाही हे पाकिस्तानला माहीत आहे आणि भारतीय जवानांना तशा सूचनाही दिलेल्या असतात. आपण पाकिस्तानची खोडी काढायची नाही, मात्र त्यांनी खोडी काढली तर उत्तर द्यायचे असे लष्कराला बजावलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानने कधीच भारताची खोडी काढण्याचे प्रकार थांबवलेले नाहीत. भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना कितीही वेळा खडसावले आणि कितीही इशारे दिले तरी पाकिस्तान दोन देशांदरम्यानच्या सीमेवर सातत्याने कुरापती काढत असते. आता सुद्धा न्यूयॉर्कमध्ये दोन देशांच्या पंतप्रधानात शांततेवर बोलणी चालू होती. पाकिस्तानचे पंतप्रधान सीमेवर शांतता नांदली पाहिजे असे म्हणत होते आणि दुसर्‍या बाजूला त्याच वेळी भारताच्या हद्दीत पाकिस्तानचे सैन्य घुसत होते. यावेळी झालेली ही घुसखोरी १९९९ सालच्या कारगीलच्या घुसखोरीसारखी आहे. त्यावेळी त्यांनी कारगीलमध्ये घुसखोरी केली. ती भारतीय लष्कराच्या उशीरा लक्षात आली. कारण ती घुसखोरी अशा ठाण्यांवर करण्यात आली होती की, जी ठाणी हिवाळ्याच्या िदवसामध्ये पूर्णपणे निर्मनुष्य राहतील असा करार दोन्ही देशांच्यामध्ये झालेला होता. वर्षानुवर्षे हा करार पाळला जात होता, कारण हा भाग हिवाळ्यात बर्फाच्छादित असतो. या कराराचे पालन करीत भारताने तिथे आपले जवान तैनात केले नव्हते. पण पाकिस्तानने मात्र कराराचा बिमोड करून तिथे आपले जवान घुसवले.

यथावकाश भारताने हे अतिक्रमण हटवले, पाकिस्तानचा पराभव झाला. भारताशी अशा प्रकारे जमिनीवरून समोरासमोर युद्ध केले तर पाकिस्तानचा पाड लागणार नाही हे पाकिस्तानला माहीत आहे. पण तसे असतानाही पाकिस्तान भारताची अशी खोडी का काढते, असा प्रश्‍न काही लोकांना पडलेला असतो. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात झालेल्या निवडणुकांच्या निमित्ताने जे विषय चर्चेला आले त्यामध्ये हा एक विषय होता. मात्र पराभव झाला तरी पाकिस्तानने भारताच्या अशा खोड्या काढल्या पाहिजेत, असे पाकिस्तानचे धोरण आहे. त्यामागचे कारण समजून घेतले पाहिजे. पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांचे असे म्हणणे आहे की, आपण ज्या भागात अशी घुसखोरी करतो तो भाग भारताचाच असतो आणि ते माहीत सुद्धा असते. पण तिथे घुसखोरी करून काही दिवस मुक्काम केला की, तो भाग वादग्रस्त ठरतो आणि तो पाकिस्तानला नाही मिळाला तरी भारताचा आहे की नाही याबाबत वाद घालता येतो. पाकिस्तानचे धोरण तरी असे आहे.

कारण पराभव झाला तरी सुद्धा भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सतत युद्धजन्य परिस्थिती ठेवल्याने काश्मीर हा वादग्रस्त मुद्दा आहे असे सतत भासवता येते. म्हणून भारताचे पंतप्रधान अमेरिकेमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेऊन, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे ठणकावून सांगत असतानाचा या अविभाज्य भागावर पाकिस्तानचे आक्रमण होत होते. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या केरन भागातील एका खेड्यामध्ये पाकिस्तानी जवानांनी कारगील पद्धतीचेच आक्रमण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिथे त्यांचा मुक्काम आहे. आक्रमण करून आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी गावाची निवड सुद्धा चातुर्याने केली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून भारतीय हद्दीतले हे गाव सततच्या युद्धजन्य स्थितीमुळे निर्मनुष्य झाले आहे. ते पूर्णपणे भारताच्या हद्दीत आहे. परंतु काही अतिरेक्यांना पाकिस्तानने या गावात घुसवले आहे आणि तिथे ते ठाण मांडून बसले आहेत. उद्या चालून पराभव झालाच आणि हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला तर पाकिस्तानचे सरकार याच्याशी आपला काही संबंध नाही म्हणून हात वर करायला मोकळे. हे आक्रमण आम्ही नव्हे तर अतिरेक्यांनी केले होते आणि ते काही आमच्या ऐकण्यात नाहीत, असा खुलासा नेहमीप्रमाणेच पाकिस्तान करणार आहे.

परंतु या अतिरेक्यांना तिथून हुसकून काढणे थोडे अवघड झाले आहे. कारण त्यांना पाकिस्तानी लष्कराकडून कुमक मिळत आहे. १९४८ साली काश्मीरमध्ये घुसखोरी करताना, १९९९ साली कारगीलमध्ये घुसखोरी करताना पाकिस्तानी लष्कराने असेच धोरण ठेवले होते. प्रत्यक्षात अतिरेक्यांना किंवा टोळीवाल्यांना घुसखोरी करायला लावायची, त्यात टोळीवाल्यांच्या वेशामध्ये काही जवानांनाही घुसवायचे आणि त्यांना लष्कराकडून मदत द्यायची असे हे धोरण अजूनही चालू आहे. आता भारतीय लष्कर त्यांना हुसकवून लावणारच आहे, परंतु या निमित्ताने भारत-पाकिस्तान सीमेवरचे एक भारतीय गाव त्यांनी या निमित्ताने वादग्रस्त ठरवून टाकले आहे. काश्मीर हा पाकिस्तानचाच आहे आणि आपण तो लढून घेण्याचा प्रयत्न करत आहोत असे जगाला दाखवून काश्मीर हा वादग्रस्त मुद्दा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा प्रस्थापित केले आहे. काश्मीरची जखम सतत चिघळत ठेवणे हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग झालेला आहे. त्यापोटी कितीही नुकसान झाले तरी ते सोसायला पाकिस्तान तयार आहे.