विहिंप नेत्याच्या मारेकर्‍यांना जन्मठेप

भुवनेश्‍वर – ओडिशातील विश्‍व हिंदू परिषदेचे नेते स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती आणि त्यांच्या चौघा सहकार्‍यांना गोळ्या घालून ठार मारल्याच्या आरोपावरून फुलवणी जिल्ह्याच्या सत्र न्यायालयाने आठ जणांना जन्मठेपेची सजा सुनावली आहे. २००८ साली ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यामध्ये हे हत्याकांड घडले होते. आठ आरोपींना जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी सजा सुनावण्यात आली.

या पाच जणांची हत्या २३ ऑगस्ट २००८ रोजी झाली होती आणि त्यानंतर कंधमाल जिल्ह्यात जातीय दंगली उसळल्या होत्या. त्या दंगलीमध्ये ३८ जण मारले गेले होते. पोलिसांवर बराच दबाव आल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर अटकसत्र चालवून या आठ जणांवर खटला भरला होता.

या आठही आदिवासी आरोपींनी आपण जलेशपट्टा येथे या पाच जणांची हत्या केल्याचे कबूल केले. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती हे ख्रिश्‍चनांना हिंदू करत असल्याचे कळल्यावरून आपण त्यांची हत्या केली, असे त्यांनी न्यायालयात म्हटले. या हत्येच्या प्रकरणात माओवादी संघटनांचा हात होता. यातील एका संघटनेचा नेता सव्यसाची पांडा आणि त्याचे पाच सहकारी या प्रकरणात आरोपी आहेत, पण ते फरारी असून अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत.