नवी दिल्ली – दसरा आणि दिवाळीच्या सणांचा विचार करून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी ग्राहकांना ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहने खरेदी करण्यासाठी कमी व्याजदराची कर्जे सढळ हाताने देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या अधिकार्यांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. अशा वस्तूंची मागणी वाढून उत्पादनाला गती यावी यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराज रामन यांनी सांगितले आहे.
बँकांना अशी कर्जे देता यावीत यासाठी केंद्र सरकारने १४ हजार कोटी रुपयांचे पुरवणी भांडवल या बँकांना पुरवलेले आहे. ते पुरेसे पडेल अशी अपेक्षा आहे. मात्र पुरेसे पडले नाही तर सरकार अजून पैसे द्यायला तयार आहे, मात्र मागणी वाढली पाहिजे आणि उत्पादनही वाढले पाहिजे असे अर्थमंत्री चिदंबरम् यांनी म्हटले आहे.
लोकांनी अशा कर्जाची मागणी करावी. विशेषत: दुचाकी वाहने खरेदी करणार्या ग्राहकांची मागणी वाढावी यासाठी या कर्जांचा व्याजदर कमी करण्याचाही सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळेल, उत्पादन वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल. सरकारला अपेक्षित असलेल्या वस्तूंमध्ये टी.व्ही., फ्रीज, वॉशिंग मशीन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.