देशात अतिरेकी कारवाया वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात देशात अतिरेकी कारवाया वाढण्याची शक्यता असून त्यातून देशातल्या जातीय ऐक्याला धोका पोचण्याची भीती आहे असे केंद्राच्या गृह खात्याने सर्व राज्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारांनी शांतताभंग करू पाहणार्‍या या शक्तींबाबत सावध रहावे, असेही आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारांना केले आहे.

राज्य सरकारच्या गृह खात्यांनी संवेदनशील ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त करावा आणि शांतता भंग करू पाहणार्‍या शक्ती आणि संघटनांना वेळीच पायबंद घालावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. राज्यात एखादी किरकोळ वाटणारी घटना घडली तरीही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तिथे धाव घेऊन त्या घटनेचे स्वरूप व्यापक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असा आदेश या निवेदनात देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या गुप्तहेर संघटनांना मिळालेल्या माहितीनुसार इंडियन मुजाहिदीन ही संघटना दिवाळीच्या काळात देशातल्या काही ठराविक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत आहे. सूरत, हरिद्वार, अहमदाबाद आणि दिल्ली ही शहरे मुख्यत्वे या संघटनेच्या राडारवर असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. लष्करे तैयबा या संघटनेने हरिद्वारचे रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोटाने उडविण्याची योजना आखली आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.