मी महात्मा गांधी यांचे अनुयायी- राहुल

अहमदाबाद- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिका-यांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारपासून दोन दिवसीय गुजरात दौ-यावर आहेत. साबरमती येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देऊन त्यांनी आपल्या दौ-याला सुरूवात केली.

साबरमती आश्रमात येणे हा मी सन्मान समजतो, मी महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांचा अनुयायी आहे, असे राहुल यांनी भेट देणा-यांच्या पुस्तिकेत लिहिले. या दौ-यात ते अहमदाबाद व राजकोट येथे पक्षाच्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. तसेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आव्हान देण्यासाठी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दोषी लोकप्रतिनिधीसंदर्भातील वटहुकुमाबद्दल आपण उद्गारलेले शब्द चुकीचे होते. मात्र आपली भावना खरी होती असे, आपल्या आईने सांगितले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपण जे काही बोललो तीच कॉँग्रेसमधील बहुतेक कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा वटहुकूम फाडून टाका असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले होते. त्यांनी मंत्रिमंडळाने बुधवारी हा वटहुकूम रद्द केला होता. सरकारने हा वटहुकून रद्द केल्यामुळे राज्यसभेतील खासदार रशीद मसूद आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे