स्वतंत्र तेलंगणाला राज्याला कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केले.

आंध्र प्रदेशचं विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण करण्याची मागणी खूप जुनी आहे. काँग्रेस कोअर ग्रुपने काही महिन्यांपूर्वीच स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर सत्ताधारी यूपीएनेही स्वतंत्र तेलंगणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. आज केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या स्थापनेला मंजुरी दिल्यामुळे तेलंगणा राज्याची निर्मिती दृष्टीपथात आली आहे.

आंध्र प्रदेशचं विभाजन करून आस्तित्वात येणारं तेलंगणा हे देशातील 29 वं राज्य असेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आंध्र प्रदेशची सध्याची राजधानी हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पहिली दहा वर्षे संयुक्त राजधानी असेल. आंध्र प्रदेशच्या तेलंगणा, आंध्र किनारपट्टी आणि रायलसीमा अशा तीनही भागातील जनतेला घटनेनं प्रदान केलेल्या मूलभूत हक्कांचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असंही सुशील कुमार शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं.

स्वतंत्र तेलंगणाच्या प्रत्यक्ष निर्मितीची अंतिम तारीख अजून मंत्रिमंडळाने निश्चित केली नसली तरी याबाबत एक मंत्रिस्तरीय गटाची स्थापना करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. हा उच्चस्तरीय मंत्रिगट स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीची प्रत्यक्ष कारवाई करेल, असं सुशील कुमार शिंदे म्हणाले.