जाट समाज दिल्लीची नाकेबंदी करणार

जिंद (हरियाणा) – जाट समाजाला आरक्षणाचे लाभ देण्याची घोषणा करावी, अन्यथा हरियाणा आणि राजस्थानमधील सारे जाट दिल्लीत येतील आणि दिल्लीला अन्य राज्याशी जोडणारे सारे रस्ते बंद करून टाकतील, असा इशारा सर्व जाट खाप महापंचायतीमध्ये देण्यात आला. ही महापंचायत हरियाणातील जिंद येथे घेण्यात आली. हे ठिकाण चंडीगढ पासून १७० कि.मी. अंतरावर आहे.

जाट समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा, अशी या समाजाची मागणी आहे. २३ डिसेंबरच्या आत ती मंजूर व्हावी असा त्यांचा आग्रह आहे. पण या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे समाजात नाराजी आहे आणि तिच्यामुळेच या खाप महापंचायतीने कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या महापंचायतीत १०० खाप पंचायतीचे नेते सहभागी झाले होते.

अलीकडच्या काळात खाप पंचायतींच्या विरोधात प्रचार केला जात आहे. परंतु कोणत्याही खाप पंचायतीने कधीही ऑनर किलिंगचा आदेश दिलेला नाही, असा खुलासा या महापंचायतीत करण्यात आला. त्याशिवाय महापंचायतीने कधीही कोणत्याही घृणास्पद कृत्याला प्रोत्साहन दिलेले नाही असेही महापंचायतीच्या ठरावात म्हटले आहे.