भोपाळ – मध्य प्रदेशाच्या खंडवा येथील कारागृहातून पोलिसांवर हल्ला करून पलायन केलेल्या सिमी (स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) या संघटनेच्या सात कच्च्या कैद्यांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सात जण काल स्वच्छतागृहाची भिंत पाडून कारागृहातून पळाले होते. या सात जणांत दोघे जण दिवसा ढवळ्या तिघांची हत्या केल्याच्या प्रकरणात अटकेत होते. त्यातल्या एकाला पकडण्यात यश आले असून सहा जणांचा शोध जारी आहे.
फरार सिमी कार्यकर्त्याला अटक
पळून जाताना या अतिरेक्यांनी लोकेश हिरवे आणि सूरो तिवारी या दोन जवांनावर चाकूने हल्ला केला. या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपींच्या पळून जाण्याची माहिती मिळताच चिताळ ब्रिगेडच्या जवानांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश तर आले नाहीच पण या सिमी कार्यकर्त्यांनी या दलातल्या जवानांच्या बंदुका पळून नेल्या आणि त्यांचे वायरलेस संच सुद्धा पळवले.
कॉंग्रेसचे नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी या घटनेला राज्य सरकारचे बेसावध पोलिसच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पळून गेलेले आरोपी याच भागातले आहेत. त्यातले दोघे खंडवा येथील असून एकजण करेली गावचा, एक जुहूचा आहे. त्यातल्या अबीब मिर्झा या खंडव्याच्याच आरोपीला सर्वोदय कॉलनी भागात अटक करण्यात आली.
