आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींचा नवा पक्ष?

हैदराबाद – काँग्रेसपासून, वेगळे पडलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आता एकला चलो रे चा नारा लावला असून, काँग्रेसमधून फारकत घेत, वेगळा पक्ष काढण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून समजले आहे.

वेगळ्या तेलंगणाची निर्मिती काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी थांबवतील या आशेने, किरणकुमार रेड्डी नव्या पक्षाची मोर्चेबांधणी काही काळ पुढे ढकलली होती. मात्र, गेल्या आठवड्यात नवी दिल्लीच्या दौर्‍यावर असताना, त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना फोन केले. मात्र, एकाही नेत्याने त्यांचे फोन उचलले नाहीत. तसेच सोनिया गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी त्यांना भेटण्याची वेळही दिली नाही.

त्यामुळे काँग्रेसने तेलंगणच्या निर्मितीला विरोध करणार्‍या रेड्डींना वेगळे पाडल्याचे स्पष्ट झाले. या सर्व पार्श्वभूमीवर, रेड्डी यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय पक्का केला आहे. वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जामीन मिळाल्यापासून, त्यांची वाढती लोकप्रियता काँग्रेसला धोकादायक असल्याचे, चित्र आहे. यामुळे आगामी काळात, सीमांध्र भागातील लोकांवर छाप पाडत, सत्ता काबीज करण्याच्या हेतूने, आता रेड्डी सम्यकांध्र सिंहम या तत्वावर नवा पक्ष स्थापन्याच प्रयत्न आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.