बॉलीवूडची मायानगरी किती अजब व विचित्र आहे, हे सगळ्य़ांनाच माहीत आहे. इथे एखाद्याचे नाते कधी आणि कुणासोबत तयार होईल आणि कुणाच्या नात्यात दुरावा येईल, याबाबत काहीच सांगितले जाऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या बरेच जवळ आलेले अभिनेता रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा यांच्यादरम्यान सध्या असेच काहीसे घडत आहे.
हल्लीच प्रियंका चोप्रा अनुभव सिन्हाच्या ‘वॉर्निंग’ या आगामी चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचली होती. या वेळी एका पत्रकाराने ‘बर्फी’तील तिचा सहअभिनेता रणबीरला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यास सांगितले. पत्रकाराने केलेल्या या विनंतीकडे सुरुवातीस प्रियंकाने साफ दुर्लक्ष केले. मात्र पत्रकार वारंवार तोच आग्रह धरू लागल्याने तिने संतापून आपण इथे अन्य मुद्यांवर वेळ दवडण्यापेक्षा ज्यावर बोलण्यासाठी जमलो आहोत, त्या चित्रपटाबाबतच चर्चा केली तर बरे होईल, असा दमही तिने त्याला भरला.
२८ सप्टेंबरला रणबीरचा वाढदिवस होता. या वर्षी तो ३१ वर्षांचा झाला, पण त्याला त्यासाठी शुभेच्छा देण्यात प्रियंकाने जराही रस दाखविला नाही. पत्रकाराने प्रियंकाला तिने टीव्ही चॅनेलच्या माईकवर रणबीरसाठी ‘हॅप्पी बर्थ डे’ म्हणावे, एवढीच विनंती केली होती. हा बाईट कदाचित त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असता, पण रणबीरचे नाव ऐकताच प्रियंका भलतीच उसळली. पत्रकाराला फैलावर घेत त्याला चांगले सुनावले. ‘अंजाना अंजानी’ आणि ‘बर्फी’ या चित्रपटांमध्ये एकत्र आलेले प्रियंका आणि रणबीर कपूर यांच्यात त्या वेळी बरीच जवळीक निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर त्यांच्यातील ही मैत्री फार काळ टिकू शकली नाही.
खरेतर त्यांची मैत्री तुटण्यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे रणबीरची सध्या प्रेयसी कॅटरिना कैफ आणि प्रियंका एकमेकींना जराही पसंत करीत नाही आणि दुसरे म्हणजे रणबीर व शाहरूख सध्या चांगले मित्र झाले आहेत. प्रियंका व शाहरूख यांचे संबंध मात्र सध्या बिनसलेले आहेत. प्रियंकाच्या या नाराजीची झळ मात्र बिचार्या पत्रकाराला सोसावी लागली.