रामचंद्र पुरुषोत्तम जोशी – ढगातून जगात.

आत्मा अमर आहे त्याला कधीच कोणी मारू शकत नाही. माणूस मरतो म्हणजे फक्त शरीर सोडतो अशी आपल्या सर्वांची धारणा असते मात्र तरीही मरणोत्तर आयुष्य असा काही प्रकार अस्तित्वात आहे? मेल्यानंतर आत्म्याच काय होतं ? शरीरापासून आत्मा वेगळा होतो म्हणजे नेमकं काय होतं ? यांसारखे अनेक प्रश्न आजवर अनुत्तरीतच आहेत. अजय फणसेकर आणि सचिन शिंदे निर्मित आणि णानो एन्टरप्रायझेस तसेच मनोज खळतकर यांची प्रस्तुती असलेल्या रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी सिनेमामध्ये मार्मिक आणि हलक्या फुलक्या शैलीमध्ये यासर्व प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. मरणोत्तर यमलोकातील जीवन आणि तेथील प्रवास असा वेगळाच विषय रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या सिनेमाद्वारा मांडण्यात येणार आहे.

जोशी हे एक सरकारी कर्मचारी असून परिवारातील सर्व सदस्यांमध्ये उत्तम स्नेहसंबंध असून त्यांच्या नात्यातील विण अतिशय मजबूत आहे. अचानक रामचंद्र जोशी स्वर्गवासी होतात आणि ते यमलोकी जातात. जोशी तेथील वातावरणाशी जुळवून घेऊ लागतात. बघता बघता वर्ष सरते आणि रामचंद्र जोशींच्या चांगल्या वागणुकीवर खुष होत यमराज त्याना त्यांच्या वर्षश्राद्ध समयी घरी जावून येण्याची परवानगी देतात. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे आहे. रामचंद्र पुरुषोत्तम जोशीच्या मुख्य भूमिकेत मातब्बर अभिनेते दिलीप प्रभावळकर असून त्यांच्यासोबत सुहास जोशी, विकास कदम, अजय फणसेकर, राजन ताम्हाणे, शीतल क्षीरसागर, दीपक शिर्के, प्रीती जोशी, मनोज खळतकर आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.