ट्रॅहल्समधून लाखो रुपयांचे विदेशी चलन जप्त

बांदा- गोव्याहून मुंबईकडे जाणा-या खासगी बसवरील चालकाकडून तब्बल २५ लाखांचे विदेशी चलन बांदा पोलिसांनी जप्त केले. चालकाकडे लाखो रुपयांचे विदेशी चलन कसे काय आले याचा शोध घेत असताना दहशतवादी संघटनांशी या चालकाचा काही संबंध आहे का, यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.

इन्सुली चेकपोस्टवर गोवा ते मुंबई अशी प्रवासी वाहतूक करणारी जॉली ट्रॅव्हल्सची आरामबस तपासणीसाठी थांबवण्याच्या सूचना चालकाला पोलिसांनी केल्या. मात्र, पोलिसांना न जुमानता चालकाने बस तशीच भरधाव पुढे नेली. त्या वेळी कामावर असलेल्या पो. कॉ. संजय कदम यांना संशय आला. त्यांनी तत्काळ मोटरसायकलवरून बसचा पाठलाग केला.

इन्सुली आरटीओकडे बरीच वाहने तपासणीसाठी थांबवल्याने चालकाला बस पुढे नेणे अशक्य झाले. त्यामुळे आरटीओ ऑफिसच्या दरम्यान बस अडवण्यात आली. बसचा पर्यायी चालक नूरउल्लाह याची तपासणी करीत असताना शर्टच्या आत पोटात काहीतरी तो लपवीत असल्याचा संशय संजय कदम यांना आला. त्याची झडती घेतली असता शर्टाच्या आतील भागात प्लॅस्टिक पिशवीमध्ये परदेशी चलनाच्या नोटा लपवलेल्या आढळून आल्या. परदेशी चलनी नोटांसह अधिक चौकशीसाठी नूरउल्लाह याला ताब्यात घेऊन आरामबस पुढे रवाना करण्यात आली.

बांदा पोलिस ठाण्यात या परदेशी नोटांची छाननी केली असता त्यात २० हजार अमेरिकन डॉलर, १४ हजार ७५० पौंड व संयुक्त अरब अमिरातचे चार हजार डी-राम चलनी नोटा आढळून आल्या. भारतीय बाजारभावाप्रमाणे या परदेशी चलनाची किंमत २५ लाख रुपये असल्याचे निरीक्षक मातोंडकर यांनी सांगितले.