जोधपूर – स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता तुरूंगातील त्यांचा मुक्काम 11 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना जोधपूर सोशन कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांसाठी वाढवण्यात येत असल्याचा निर्णय दिला.
आसाराम बापूंवर अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. 1 सप्टेंबर रोजी आसाराम बापूंना इंदूरमधून अटक करण्यात आली होती. आज आसाराम बापूंच्या सुनावणीच्या वेळी त्यांचे वकील कोर्टात हजर नव्हते. त्यांच्या वकिलांच्या अनुपस्थितीबाबत न्यायालयाने कोणतेही भाष्य केले नाही. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी त्याचं वकीलपत्र घेतलं आहे. 72 वर्षांच्या आसाराम बापू याचा जामीन अर्ज यापूर्वीच राजस्थान हायकोर्टाने फेटाळला आहे.