सामायिक आंध्रसाठी निकराचा लढा

हैदराबाद – आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती करण्याविषयीची सूचना ज्या दिवशी लोकसभेत मांडली जाईल त्या दिवशी हैदराबादमध्ये तिच्या विरोधात दहा लाख लोकांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा सीमांध्र भागातील सरकारी कर्मचार्‍यांचे नेते पी. अशोक बाबू यांनी केली आहे. आंध्राच्या विभाजनाच्या विरुद्ध सीमांध्र भागातील जनतेचा लढा निकाराने लढवला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत राज्याचे विभाजन होऊ दिले जाणार नाही, असे अशोक बाबू यांनी जाहीर केले आहे.

तेलंगण वगळता आंध्रातील अन्य भागातील सरकारी कर्मचारी गेल्या १३ ऑगस्टपासून संपावर आहेत. त्यांचा संप गेल्या दीड महिन्यापासून सलगपणे १०० टक्के सुरू आहे आणि त्यामुळे आंध्र प्रदेशातले प्रशासन ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपावर असलेले कर्मचारी केवळ संप करून घरी बसलेले नाहीत तर त्यांनी आंदोलनाचे लहान-मोठे प्रयत्नही चालवले आहेत आणि त्यामुळे राज्यात कुठे रास्ता रोको, कुठे निदर्शने असे प्रकार नित्य होताना दिसत आहेत.

पी. अशोक बाबू यांनी काल हैदराबाद येथील एका मोठ्या सभेत भाषण केले आणि राज्याचे विभाजन कसे सर्वांच्या गैरसोयीचे आहे हे दाखवून दिले. विभाजन झाल्यास पाण्याचे वाटप करणे कसे अशक्य होणार आहे हे त्यांनी दाखवून दिले. राज्यातल्या सर्व प्रमुख शिक्षण संस्था हैदराबादेत असल्यामुळे राज्याचे विभाजन सीमांध्रा भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करणारे ठरेल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

पी. अशोक बाबू यांची ही सभा सात तास चालली होती. तिच्यात सामायिक आंध्राच्या समर्थनार्थ अनेक नेत्यांची भाषणे झाली. सीमांध्रा भागातील सर्व राजकीय पक्षांच्या आमदार-खासदारांनी आणि पदाधिकार्‍यांनी आपली पदे सोडून द्यावीत, अशी मागणी या सभेत करण्यात आली.