हैदराबाद – सुमारे साडेतीन महिन्यांच्या कच्च्या कैदेतून बाहेर पडलेले वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांनी बाहेर पडताच आंध्र प्रदेश अखंड ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात या मागणीसाठी सामाईक आंध्र जॉईंट ऍक्शन कमिटी या संघटनेला त्यांनी संयुक्त आंध्राची मागणी करणारे सह्यांचे निवेदन केंद्र सरकारला पाठविण्याचे आवाहन केले. असे निवेदन पाठविणार असल्यास त्यावर आपण प्रथम सही करू, असे ते म्हणाले.
बाहेर पडल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना त्यांनी आंध्र प्रदेशातील लोक एकसंधपणे उभे राहिले तर आंध्र प्रदेश संयुक्त होऊ शकेल आणि त्याचे विभाजन टळेल, अशी आशा व्यक्त केली. केंद्र सरकारने राज्याशी वागताना वडिलची भूमिका घेतली पाहिजे आणि राज्यांचे विभाजन करताना लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस आणि तेलुगू देसम या दोन्ही पक्षांवर त्यांनी टीका केली. कॉंग्रेस पक्ष केवळ मतांचे राजकारण करत आहे आणि तेलुगू देसम पक्ष आपले स्थान टिकविण्यासाठी धडपड करत आहे, असे ते म्हणाले. दोन्ही पक्षांना राज्याच्या विभाजनाचे गांभीर्य कळलेले नाही, मात्र गेल्या ६० दिवसांपासून आंध्र प्रदेशाचे ६० टक्के लोक रस्त्यावर उतरले आहेत याची दखल त्यांना घ्यावीच लागेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.