मोदींच्या नव्या कारच्या किंमतीचा दावा खोटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहन सुरक्षा ताफ्यात दाखल झालेल्या नव्या मर्सिडीज मेबॅक ६५० गार्ड कारच्या किंमतीबाबत केले गेलेले दावे धादांत खोटे असल्याचे सरकारी सूत्रांकडून स्पष्ट केले गेल्याने या दाव्यांना नवी कलाटणी मिळाली आहे. मोदींच्या नव्या कारची किंमत १२ कोटी असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र सरकारी सूत्रांकडून या कारची किंमत उगीचच वाढवून चढवून सांगितल्याचा खुलासा केला गेला आहे. या कारची किंमत ४ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी कोणती कार निवडायची याचे अधिकार स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कडे असतात. त्यानुसार मोदींसाठी कोणती कार हवी याचा निर्णय मोदींचा नसतो तर मोदी यांना असलेला धोका आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन कारची निवड केली जाते. मोदी सत्तेवर आले तेव्हा कार बदलण्याची मुदत ८ वर्षांची केली गेली होती मात्र स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने ती ६ वर्षांवर आणली. मोदींची सुरक्षा लक्षात घेता त्यांच्यासाठी निवडल्या गेलेल्या कार्सची फीचर्स उघड करणे धोक्याचे असल्याचेही सांगितले जात आहे.

मोदी पूर्वी बीएमडब्ल्यू कार वापरत होते ती बदलण्यामागाचे कारण स्पष्ट केले गेले असून बीएमडब्ल्यूने त्या मॉडेलचे उत्पादन बंद केले यामुळे कार बदलली गेली होती. मर्सिडीज मेबॅक ६५० गार्डवर एके ४७ गोळ्यांचा प्रभाव होत नाही तसेच ही कार रासायनिक, गॅस हल्ल्यापासून सुरक्षित आहे. अर्थात या कारचा वेग ताशी १६० किमीवरच ठेवला गेला आहे. तिला स्पेशल रन फ्लॅट टायर सुविध आहे त्यामुळे पंक्चर झाली तरी ती वेगाने धावू शकते.