मुंबई : शिवसेनेत राहून आतापर्यंत अनेक पदे भूषवणारे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी गेल्याा काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. दक्षिण-मध्य मुंबई अथवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी. ते शक्य नसल्यास पुढील वर्षी राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द मिळावा यासाठी जोशी सरांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांच्याशी असलेल्या जवळीकतेतून ते मनसेमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
माजी मुख्येमंत्री मनोहर जोशी आगामी लोकसभा निवडणूक दक्षिण-मध्य मुंबईतून लढवण्यास उत्सूक आहेत; परंतु पक्षाने मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेवाळे यांनी गणेशोत्सव काळात या भागात जागोजागी होर्डिंग लावून प्रचारही सुरू केला होता. त्यामुळे मनोहर जोशी चांगलेच अस्वस्थ झाले. उध्दव ठाकरे यांनी जोशी सरांना “मातोश्री’वर बोलावून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु जोशी सरांची नाराजी कमी झालेली नाही.
गेली ४५ वर्ष आपण शिवसेनेत असून पक्षात असले प्रकार आपण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, असे जाहीर वक्तव्य करून जोशी यांनी बंडाची भाषा सुरू केली आहे. जोशी यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असून आजवर शिवसेनेकडून सर्व पदे मिळूनही बंडाचे निशाण फडकवणा-या जोशी सरांविरुध्द संतापही व्यक्त केला जातो आहे. लोकसभा निवडणुकीतही जोशी सरांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून उमेदवारी मिळणार नसेल तर कल्याणमधून निवडणूक लढवण्याची तयारी जोशी यांनी दर्शवली होती; पण त्यालाही पक्षनेतृत्वाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जोशी यांनी दबावतंत्र सुरू केल्याची चर्चा आहे. पुढील वर्षी शिवसेनेचे राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत व राजकुमार धूत निवृत्त होत आहेत. लोकसभेला उमेदवारी मिळणार नसेल तर राज्यसभेसाठी आश्वासन मिळवण्याचा जोशी सरांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.