डागाळलेल्या लोकप्रतिनिधींना संरक्षण देणारा अध्यादेश फाडून टाका : राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि युवराज राहुल गांधी यांनी आज आश्चर्यकारकपणे सरकारच्या थेट विरोधातील भूमिका घेत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकारण्यांची पाठराखण करणारा अध्यादेश बकवास असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आज प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला स्पष्ट विरोध केला आहे. हा अध्यादेश फाडून टाकला पाहिजे असं आवाहनही त्यांनी केले आहे.

याच पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी राहुल गांधीची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचंही स्पष्ट केलं. देशातील कोणत्याही न्यायालयाने एखाद्या आमदार-खासदाराला किमान दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावली असेल, त्याचं लोकप्रतिनिधीत्व त्या क्षणापासून रद्द होईल, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाचा फेरविचार करण्याची केंद्र सरकारची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे केंद्र सरकारने अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ ठरविण्याचा प्रयत्न केला.

कालच राहुल ब्रिगेडमधील एक सदस्य मिलिंद देवरा यांनी सरकारने संमत केलेल्या अध्यादेशाला आपला विरोध असल्याचं सांगितलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयाचा मतदारांना नकाराधिकार देण्याचा निर्णय आल्यानंतर राहुल गांधीनी घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधकांचेही डोळे वटारले आहेत.